संविधान संस्कृती संवर्धक साहित्य
मराठी साहित्यात आजवर अनेक साहित्यपवाह निर्माण झाले आहेत. यातील काहींनी पस्थापित साहित्याच्या चिरेबंदी वाड्याला हादरे दिले. काहींच्या पलयंकारी नवोन्मेषांनी युगदाहक वन्ही पज्वलीत केला, तर काहींच्या अस्तित्वशोधाच्या अनिवार उर्मीने निबर ब्रह्मकोषाला चिरुन स्वातंत्र्याचा अवकाश विस्तीर्ण करण्याचा पयत्न केला. मात्र तामसी तत्त्वज्ञानाच्या चौथऱयावर अद्वैताच्या भुलभुलैय्याचा वापर करुन उभारलेल्या मायावी साहित्याच्या मयसभा उद्ध्वस्त करण्याची ताकद कमविण्यात हे सारे पवाह थिटे पडले. हे प्रयत्न तोकडे पडले याचा अर्थ या प्रयत्नांमध्ये सृजनशक्ती आणि संकल्पशक्ती नव्हती असे नव्हे. या प्रयत्नांमध्ये प्रलयंकारी विजांचा लखलखाट होता. लाचारी आणि गुलामीच्या ब्रह्मकवचाची शकले करण्याचा निर्धार होता. युगायुगाच्या दडपलेपणाला झुगारुन देण्याचा अभिनिवेश होता! तरीही परिवर्तनाचा विजयोत्सव आम्हाला साजरा करता आला नाही. क्रांतीच्या अभ्युदयाला आवश्यक परिपूर्ण शस्त्रागार हाताशी असतांनाही आम्ही पराभवाच्या फुफाट्यात का होरपळले गेलो? आमच्या प्रज्ञावंत महायोद्ध्यांच्या हातातील आयुधे कुचकामी का ठरलीत? परिवर्तनाची बाराखडी स्वत्वसात करुनही आम्हाला स्वउद्धाराबरोबरच समाजोध्दाराचे महाकाव्य का लिहिता आले नाही? अशा एक ना अनेक प्रश्नाच्या गुंत्यात गुरफटून नवोन्मेषी सृजनात्मक मने खिन्न होऊन मलूल वर्तमानाच्या ओझ्याखाली दबली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष वास्तवाचे आकलन करुन अवरोधक दुरितांचा निःपात करीत उगवत्या युगधर्माला कल्याणकारी वळण कसे देता येईल याची व्यूहरचना करणे आवश्यक झाले आहे.
परिवर्तनाचा व्यूह
समाजक्रांतीतून समाज परिवर्तन हा आत्तापर्यंतच्या परिवर्तनवादी चळवळीचा मुख्य विचारविषय राहिला आहे. भारतातील परिवर्तनवादी चळवळीचे मार्क्सवादी डाव्या चळवळी आणि बुध्द, फुले, शाहू, आंबेडकरवादी चळवळी असे प्रमुख विभाजन आहे. यापैकी मार्क्सवादी चळवळी या रितीप्रधान म्हणजेच विधीनिषेध न बाळगता उपलब्ध भल्याबुऱया सर्व मार्गांचा अवलंब करण्याच्या समर्थक आहेत. यामुळे या चळवळी कामगार संघटनांची हुकुमशाही ते हिंसक नक्षलवादी आंदोलन या लोकशाही विरोधी मार्गांना त्याज्य मानतांना दिसत नाहीत. बुध्द, फुले, आंबेडकरवादी प्रवाहातील चळवळी नितीप्रधानतेला म्हणजेच ईष्ट मार्गानेच साध्यप्राप्ती करण्याला महत्व देणाऱया आहेत. यामुळेच माणसाचे आतंरिक परिवर्तन करण्यासाठी आवश्यक पबोधन करुन संवैधानिक मार्गानेच साध्यपाप्ती करण्याची धडपड या चळवळींनी चालविली आहे.मात्र या दोन्ही प्रवाहातील चळवळींना साध्यप्राप्तीत म्हणावे तसे यश लाभलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे साध्यप्राप्तीसाठी पूर्वावश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत याचा आढावा घेणे आवश्यक आहे. हाती घेतलेले कार्य सिध्द होण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असलेली पहिली गोष्ट म्हणजे तात्विक अधिष्ठान किंवा सैध्दांतिक आधार. दुसरी बाब म्हणजे विविध प्रकारची साधने आणि माध्यमे तिसरी बाब म्हणजे या साधनांचा आणि माध्यमांचा परिणामकारक वापर करण्याचे प्रयत्न आणि चौथी गोष्ट म्हणजे या तिन्ही गोष्टींचा मेळ घालून व्यूह रचणारा कर्ता (कार्यकर्ता)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूस्थानाची पुनर्रचना करुन भारताची निर्मिती करतांना भारताचा जो सैध्दांतिक आधार ठरविला आहे तो भारतीय संविधानात विहित केला आहे. या सैध्दांतिक अधिष्ठानाला भारतातील सर्व जनतेने 26 जानेवारी, 1950रोजी मान्यता दिली आहे. हा देश लोकशाही धर्मनिरपेक्ष,समाजवादी गणराज्य असेल. या देशातील नागरिकांना श्रध्दा, उपासना, आचार, विचार, अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य असेल दर्जा आणि संधिची समानता असेल. सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळेल. एकमेकांमध्ये बंधुत्व निर्माण करण्यात येईल आणि प्रत्येक व्यक्तिला सन्मानपूर्वक जीवन व्यतित करण्याचा हक्क असेल हे साध्य भारतीय संविधानाने निश्चित केले आहे. हे साध्य पूर्ण करण्यासाठी लागणारी साधने आणि माध्यमे यामध्ये लिखित आणि अलिखित साहित्य, तात्विक अधिष्ठाने अभिव्यक्त करणाऱया ललित कला यांचा समावेश होतो. या साधनांचा आणि माध्यमांचा परिणामकारक वापर करणे म्हणजे साहित्य आणि कलांची निर्मिती करणे होय. यांचा कर्ता म्हणजेच साहित्यिक होय. म्हणजेच संविधानाचे तात्विक अधिष्ठान आपल्या नेणिवेत रुजवून साहित्यिकांनी साहित्यनिर्मिती केली तर या साहित्याच्या आधारे भारतीय व्यक्तीमानस संस्कारित होईल. अशा रितीने संस्कारीत भारतीय व्यक्तीमानस संविधानात निर्धारित लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समतामूलक भारतीय समाजरचना निर्माण करण्यासाठी सक्षम होईल. परंतु भारतीय नागरिकांना उपासना, श्रद्धा, आचार, विचार यांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता, सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय, बंधुत्वाची जोपासना तसेच सन्मानपूर्वक जीवन व्यतीत करण्याचा हक्क यांची हमी देणाऱया, संविधान नामक अभिजात साहित्य संहितेची अंमलबजावणी होऊन 60 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही भारतीय साहित्यसंस्था ब्रह्मशास्त्रांवर आधारीत `छद्मपुराणांचे'सृजन करण्यास उत्तेजन देत आहेत. हेच भारतीय साहित्यावरील अरिष्ट आहे. या अरिष्टाला भेदून टाकण्यासाठी एकीकडे भारतीय संविधानाचा मूलाधार असलेल्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व आणि व्यक्तिसन्मान या मूल्यांचा परिपोष करणारे साहित्य निर्माण करण्यासाठी सम्यक पयास करणे अगत्याचे आहे. तर दुसरीकडे अकुशल मनोभावना उद्दिपित करणारे, तर्पदुष्ट, दैववादी, वैराग्यवादी, साहित्य जागृत वाचकांच्या श्रोत्यांच्या, कलाकारांच्या आणि वितरकांच्या संघटित ताकदीच्या जोरावर झाकोळून टाकणारा परिवर्तनाचा व्यूह निर्माण करणे आवश्यक आहे.
संविधान संस्कृती संवर्धनाची आवश्यकता
भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना पाप्त झालेल्या भारतीयत्वाचा मूलाधार आहे. हे पाहता भारतीयत्वाची ओळख संविधानात विहित असलेल्या मुल्यांच्या निकषावर झाली पाहिजे. याचा अर्थ व्यक्तीचे जन्मसिद्ध स्वातंत्र्य नाकारुन त्याच्यावर `देव, दैव, धर्म, वंश, जात, वर्ग या आधारे गुलामी लादण्याचे समर्थन करणे म्हणजे भारतीयत्वाचा अभाव असणे होय. याच कमाने समानता, न्याय, बंधुत्व, व्यक्तीसन्मान या मुल्यांना आपल्या अंगी बाणवून त्याआधारे व्यक्तीसंबंध आणि सामाजिक संबंधाचे निर्वाहन करण्यास जे उणे पडतात त्यांच्यामध्ये भारतीयत्वाचा अभाव आहे असे म्हणता येईल. मानवी हक्काच्या वैश्विक जाहिरनाम्यात नमूद केलेली सर्व पमुख तत्त्वे भारतीय संविधानात अंतर्भूत आहेत. हे लक्षात घेता भारतीय संविधानाचा मुख्य हेतू भारताच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय संस्कृतीची पुनर्रचना करणे असा आहे. यासाठी संविधानातील विचार आणि सामाजिक राजकीय व्यवहार यामध्ये एकजिवत्व असणे गरजेचे आहे. तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घालून जनमानस संस्कारीत करण्याचे कार्य साहित्यिक आपल्या साहित्यिकृतीद्वारे करीत असतो. त्यामुळे साहित्यिकांची नेणीव कोणत्या मूल्यांनी संस्कारीत झाली आहे हे महत्त्वाचे असते. वर्तमान भारतात राजकीय व्यवहाराचे तत्त्वज्ञान स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व आणि व्यक्तीसन्मान या संवैधानिक मूल्यांवर बेतले आहे. आर्थिक व्यवहाराचे तत्वज्ञान भांडवली मूल्यांवर आधारित आहे. तर, पत्यक्ष समाजजीवनाचे तत्त्वज्ञान अजूनही प्रत्येक धर्माची धर्मशास्त्रs व पाचीन धार्मिक संहितामधील वर्णजातवर्ग विषमता, लिंगाधारीत, पक्षपात, कर्मसिद्धांत, आत्मा-परमात्मा, मोक्षपाप्ती या गोष्टींना पमाण मानणारे आहे. ही विसंगती दूर होऊन आर्थिक व सामाजिक जीवनाचे तत्त्वज्ञान संवैधानिक मूल्यांना पमाण मानणारे होत नाही तोपर्यंत भारतातील कोणताही माणूस खऱया अर्थाने भारतीय होऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन भारतीय नागरिकांची नेणिव संवैधानिक मूल्यांच्या आधारे संस्कारीत करणे आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार व्यवहाराला संवैधानिक मूल्यांचे अधिष्ठान पाप्त करुन देणे म्हणजेच संविधान संस्कृतीचे संवर्धन करणे होय.
राष्ट्रधोरणाशी सुसंगत कला संस्कृती आणि साहित्य
भारतीय इतिहासाच्या विशाल पटलावर दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, या देशात ज्या ज्या राजाधिराजांनी आपले अधिपत्य पस्थापित केले त्यांनी पमाण मानलेल्या तत्त्वज्ञानाचा परिपोष करणाऱया कला, साहित्य आणि संस्कृतीची निर्मिती त्या, त्या काळात करण्यात आली. जनमानसात त्यांची रुजवणूक होण्यासाठी राज्यसंस्थेने जाणिवपूर्वक पयत्न केले. राज्यकर्त्यांच्या तत्त्वज्ञानाशी मतभेद असणारांनी या तत्त्वज्ञानाला विरोध करणाऱया कला, साहित्य निर्मितीचा पयत्न केला. परंतु राजमान्यता न लाभल्याने हे पवाह अगदीच क्षीण राहिले. अगदी वेदवाङमयाच्या काळापासून पाहिले तरी वेदकाळात पभावी असलेल्या वर्णव्यवस्था, यज्ञसंस्कृती यांचे गुणगान करणाऱया ऋचांचीच रचना करुन त्यास आत्यंतिक पतिष्ठा देण्यात आली. तथागत सम्यक सम्बुद्धांनी मानवमुक्तीचे नवे तत्वज्ञान पवर्तीत केल्यानंतर तत्कालीन गणराज्यांनी आणि राजकांनी या तत्वज्ञानाचा स्वीकार केला. त्यापुढील काळात बुद्धाच्या या मानवमुक्तीचा तत्वज्ञानाची रुजवणूक जनमानसात करणारे त्रिपिटकीय वाङमय निर्माण झाले. बौद्ध राजांच्या काळात सर्वपथम लिपीचा शोध लागला. यामुळे कल्याणकारी राज्याच्या पस्थापनेसाठी आवश्यक राजाज्ञा शिलालेखांवर कोरण्यात आल्या. भारतातील हे पहिले लिखित साहित्य होय. सम्राट अशोकाच्या काळात हजारो शिलालेख, स्तूप, महाविहार, निर्माण करुन सम्राट अशोकाच्या राज्यधोरणाचा मूलाधार असलेल्या कल्याणकारी राज्याच्या तत्वज्ञानाचा जनमानसात पचार-पसार करण्यात आला. सम्राट अशोकाचे साम्राज्य विघटित झाल्यानंतर तत्कालीन जम्बुद्विपाची विभागणी बौद्ध तत्वज्ञानाची समर्थक राज्ये व वैदिक तत्वज्ञानाची समर्थक राज्ये अशी झाली. या कालखंडात जेथे बौद्ध तत्वज्ञान समर्थक राज्ये होती, अशा राज्यात बौद्ध मूर्तीकला, चैत्यगृहे व विहारगुंफा खोदण्याची कला, भिंतीचित्रे काढून रंगविण्याची कला विकसित झाली. तर वैदिक तत्वज्ञानाच्या समर्थक राज्यांमध्ये वैदिक तत्वज्ञानाचे समर्थक करणारे साहित्य, कला विकसित झाल्या. शेवटचे बलाढ्य बौद्ध साम्राज्य हर्षवर्धनाचे होते. हर्षवर्धनाच्या काळानंतर बौद्ध कला, साहित्य यांच्या निर्मितीस ओहोटी लागली. त्यापुढील, काळात केवळ वैदिक तत्वज्ञानाचा पचार-पसार करणारे साहित्य निर्माण झाले. भारतात तुर्कांच्या आगमनानंतर तुर्कांची महत्ती जाणारे साहित्यसुद्धा निर्माण होऊ लागले. इतिहासाचा हा आढावा पाहिल्यास राष्ट्रधोरण ज्या तत्वज्ञानावर आधारित होते त्या तत्वज्ञानाचा पचार-पसार करणारे साहित्य निर्माण झाल्याचे दिसते. इंग्रजाच्या आगमनानंतर मात्र ही स्थिती पालटली. इंग्रजांनी भारतीय समाजजीवनाचे आधुनिक उदारमतवादी तत्वज्ञानाच्या आधारे पुनर्गठन करण्यास सुरुवात केल्याबरोबर ब्राह्मणश्रेष्ठत्वावर आधारित वर्णजाती वर्ग व्यवस्था खिळखिळी होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या तत्वज्ञानाचा धिक्कार करण्यासाठी वैदिक पुनरुज्जीवनवादी साहित्य निर्मितीला पारंभ झाला. ही परंपरा आजतागायत सुरु आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लागू करण्यात आलेले संविधान जातीव्यवस्थान्तक, उदारमतवादी, भांडवली लोकशाहीचा पुरस्कार करते. हा देश कसा असेल? तर तो सार्वभौम, लोकशाही, धर्मनिरपेक्ष समाजवादी गणराज्य असेल! स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व आणि व्यक्तीसन्मान मिळण्याची हमी या राष्ट्रात असेल. हेच या देशाच्या वर्तमान राष्ट्रधोरणाचे तत्वज्ञान होय. राष्ट्रधोरणाच्या या तत्वज्ञानाशी सुसंगत साहित्यनिर्मिती झाली तरच राष्ट्रातील नागरिकांची मने या तत्वज्ञानाने अभिसंस्कारीत होतील. त्यातूनच या तत्वज्ञानाधारित संस्कृतीची निर्मिती होईल. या संस्कृतीच्या तेजःपुंज हिरण्यगर्भात वर्तमानाला काळवंडून टाकणाऱया लिंगाधारित जातीभेद, धर्मविद्वेष, दहशतवाद, वर्गीय विषमता, शोषण, हुकूमशाही, विषमता, पांतविद्वेष आणि मानवी अपतिष्ठा या अमंगल ब्रह्मपशूंचा दाहसंस्कार संपन्न होईल. म्हणूनच ज्यांचे या राष्ट्रावर पेम आहे. ज्यांची पतिभा कोणत्याही धर्मजातीवंशाशी नव्हे तर भारत नावाच्या देशाशी इमान राखून आहे. त्यांनी या देशाने स्वीकारलेल्या राष्ट्रधोरणाच्या तत्वज्ञानाला पमाण मानून साहित्यनिर्मिती केली तरच त्यांच्यातील भारतीयत्वावर शिक्कामोर्तब होईल.
अभारतीय मराठी साहित्य
प्रस्थापित मराठी साहित्यात संवैधानिक मुल्यांचे प्रतिबिंब दिसून येत नाही. संवैधानिक मुल्यांच्या सूक्ष्म निकषावर या साहित्याचे समिक्षण केल्यास प्रस्थापितांचे साहित्य फार तर हिंदूस्थानी ठरते. परंतु भारतीय ठरत नाही. अशा अभारतीय साहित्याला समाजमान्यता व राजमान्यता लाभली असल्यामुळे राष्ट्रीय आणि सामाजिक स्वास्थ धोक्यात आले आहे. सामाजिक आणि आर्थिक न्याय पस्थापित करण्यासाठी आवश्यक समाजमन निर्माण होण्याची आवश्यकता पस्थापित साहित्याने उधळून लावली आहे. त्यामुळे राष्ट्रभक्त साहित्यिकांनी भारतीयत्व विकसित करणारी साहित्यनिर्मिती केली पाहिजे. अंधश्रध्दा वाढविणारे, लाचखोरीचे समर्थन करणारे, दांभिक, ऐतखाऊ, ढोंगी, स्त्रीया तसेच निसर्गतः लिंगनिश्चितीवैगुण्य असलेल्या व्यक्तिविषयी तुच्छता बाळगणारे, पुरुष प्रधानता समर्थक, भ्रष्टाचारी, कर्मदरिद्री, श्रमाधारित उच्चनिचता समर्थक, स्त्रीचे शारीरिक व मानसिक शोषण करणारे या सर्व प्रवृत्तीविषयी जनसामान्यांच्या मनात चिड निर्माण करणारे साहित्य राष्ट्रप्रेमी भारतीय (हिंदूस्थानी नव्हे) साहित्यिकच निर्माण करु शकतात.
साहित्यिकांची भावनिक बुद्धीमत्ता
भारतीयत्वाची नैतिक पात्रता प्राप्त केल्याशिवाय समाजाला दिशादर्शक भारतीय साहित्य निर्माण होणे अशक्य आहे. त्यासाठी प्रथमतः साहित्यिकांमध्ये भारतियत्व रुजणे आवश्यक आहे. हे भारतीयत्व म्हणजे काय याची चर्चा आपण यापूर्वी केली आहे.नितीसंस्कार करण्यास सक्षम असे साहित्य निर्माण करण्यासाठी साहित्यिकांच्या भावनिक बुद्धीमत्तेचे नियोजन होणे आवश्यक आहे. जगाच्या पाठीवरील सर्वच मनुष्यांमध्ये सारख्याच भावना विद्यमान असतात. मात्र या भावनांचे व्यवस्थापन करण्याची पत्येक व्यक्तीची पद्धत व कुवत यामध्ये तफावत असते. माणसात राग, दुःख, आळस, हर्ष, भिती, मोह,उतावळेपणा, बढाईखोरपणा, निष्कीयता असे विविध मनोविकार असतात. या मनोविकारांचे एकारलेपण माणसाला भावनाविवश बनविते यातून पमुख चार मानवी वर्तन पकार उद्भवतात.
1.ज्या व्यक्ती झालेल्या निर्णयाची केवळ अंमलबजावणी करतात अशा व्यक्ती स्वतबद्दल नकारात्मक असतील आणि त्यांची स्वतबद्दलची स्वीकारशक्ती डळमळीत असेल तर ते केवळ सांगकामे, निष्किय व आत्मविश्वास नसलेले बनतात.
2.ज्या व्यक्ती स्वतच्या ध्येयसिद्धीत अपयशी ठरतात ते अधपतीत होऊन आज्ञाधारकतेकडे झुकतात स्वतला कमी लेखण्याबरोबरच इतरांनाही ते कमी लेखतात. अशा व्यक्ती व्यक्तीगत स्वार्थाच्या आहारी जाऊन चमचे म्हणून काम करतात.
3.ज्या व्यक्ती उद्धट आणि मग्रुर असतात अशा व्यक्ती नेहमीच स्वतचेच खरे करणाऱया असतात. इतरांवर सत्ता गाजविणे हा आपला हक्क आहे अशी त्यांची समजूत असते. केवळ आपणच बरोबर व इतर सर्वजण चूक अशी त्यांची धारणा असते.
4. ज्या व्यक्तींची स्वतच्या ध्येयावर अढळ निष्ठा असते व ध्येयपाप्तीसाठी कोणत्याही हालअपेष्टा सहन करण्याची ज्यांची तयारी असते अशा व्यक्ती सम्यक दृष्टीकोण बाळगतात. अशा व्यक्ती दुसऱयांच्या मतस्वातंत्र्याचा आदर करुन त्यांच्या सर्व गुणदोषासहित मैत्रीपूर्ण संबंध घडविणाऱया असतात.
व्यक्तींचे हे वर्तनपकार ओळखून त्याआधारे स्वतचे मूल्यमापन साहित्यिकांनी करणे व स्वतमध्ये उन्नती घडवून आणणे आवश्यक असते. स्वतमधील भावनांचे व्यवस्थापन करुन सभोवतालच्या सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय घटनांविषयी संवैधानिक मूल्यदृष्टी ठेऊन केलेली साहित्यिनिर्मिती समाजधारणेस उपयुक्त ठरेल. याचे भान साहित्यिकांनी ठेवणे आवश्यक आहे.
परिवर्तनाचा व्यूह कसा असेल?
हिंदूस्थानाची पुनर्रचना करुन भारताची निर्मिती ज्या तत्वाधारे करायची आहे, ती तत्वे आणि त्यावर आधारीत प्रशासनप्रणाली भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. ही तत्वे व त्यावर आधारीत संस्था (संसद, कार्यपालिका, न्यायपालिका इ.) हे भारत नावाच्या देशाचे राजकीय भौतिक वास्तव होय. या संस्थांच्या परिघाबाहेर असलेल्या व प्रत्यक्ष समाजजीवनाचे प्रचालन करणाऱया धर्मसंस्था, जातिसंस्था, प्रथा, परंपरा, सण, उत्सव, भाषा, साहित्य हे भारताचे सामाजिक वास्तव होय. भारतीय लोकजीवनाचे नियंत्रण करणाऱया भौतिक आणि सामाजिक वास्तवात प्रचंड अंतर्विरोध आहे. या भौतिक आणि सामाजिक वास्तवाने वेढलेले भारतीय व्यक्तिंचे मानसिक वास्तव नितीदृष्ट्या दोलायमान आहे म्हणजेच राजकीय बाबतीत लोकशाहीवादी, पारदर्शक राज्यकारभाराची मागणी करणारे, स्वतःच्या हक्काप्रती जागृत परंतु सामाजिक बाबतीत मात्र जन्माधारित जाती-वर्गभेद मानणारे, सामाजिक व धार्मिक परंपराविषयी दुराग्रह बाळगणारे आणि राष्ट्रीय कर्तव्याप्रति उदासिन असे आहे. या तिहेरी अंतर्विरोधाचा एकामेंकावरील असंतुलित दाब, कर्ष आणि पीळ यामुळे प्रचंड ढोंगबाजी, दांभिकता, कर्तव्यविन्मुखता या गोष्टींना उधान आले आहे. यामुळे भारतातील व्यक्तिमात्रांचे भौतिक वास्तव, सामाजिक वास्तव व मानसिक वास्तव यामध्ये असलेला अंतर्विरोध जसजसा कमी-कमी होत जाईल तसतसे समदृष्टी बाळगणारे भारतीय व्यक्तिमानस विकसित होत जाईल. भारतीय व्यक्तिमानस पूर्ण विकसित होऊन व्यक्ति अंतर्बाह्य भारतीय झाली तर या विरोधाची सोडवणूक होईल हा अंतर्विरोध कमी करण्याचे काम साहित्याद्वारे झाले पाहिजे.
मार्क्सवादी दृष्टीकोनातून अंतर्विरोधाची सोडवणूक करण्याचा मार्ग म्हणजेच हे अंतर्विरोध तीव्रतम करीत न्यायचे. विरोध परिपक्व होऊन तो परमोच्च बिंदूवर पोहचला की, त्या विरोधांचा परस्परात संघर्ष होऊन कडेलोट होईल. यामुळे विरोध विसर्जित होतील. आत्तापर्यंतच्या सर्वच परिवर्तनवादी साहित्यप्रवाहाने विरोधाच्या सोडवणूकीचे हेच परिप्रेक्ष्य गृहित धरले आहे. दलित, ग्रामीण, विद्रोही, बहुजन इ. साहित्यप्रवाहसुध्दा याला अपवाद नाहीत. भारतीय संविधानात अंतर्भूत असलेले विरोधाच्या सोडवणूकीचे परिप्रेक्ष्य यापेक्षा वेगळे आहे. भारतीय समाजजीवनात असलेल्या मानवताविरोधी मूल्यांना संविधानाने 26 जानेवारी 1950 रोजी विध्वंसक नकार देऊन नव्या मूल्यसंस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली. यापुढे भारतीय समाजजीवनात असलेले विरोध, विसंगती, कमतरता दूर करुन सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचे सुधारणवादी परिपेक्ष्य भारतीय संविधानाने पस्थापित केले. या सुधारणावादी परिपेक्ष्यात भारतीय समाजजीवनातील विरोध, विसंगती कमतरता दूर करुन समतामूलक समाजनिर्मिती करण्याचे काम संविधानाने राज्यावर म्हणजेच शासनयंत्रणेवर सोपविले आहे. यासाठी मानवी मूल्यांची तसेच व्यक्तीसन्मानाची जपणूक करण्यासाठी मुलभूत हक्काची हमी देण्यात आली आहे, तर राज्यधोरणाची नितीनिर्देशक तत्वे याद्वारे राज्यांनी आर्थिक व सामाजिक अन्याय दूर करुन समाजातील विरोध, विसंगती, कमतरता समाप्त करण्याची अपेक्षा बाळगण्यात आली आहे. ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी शासनयंत्रणा हाताळणारी माणसे नितीमान असणे जसे आवश्यक आहे तसेच उपलब्ध साधनांचा परिणामकारक वापर करण्याइतपत सक्षम असणेही आवश्यक आहे. नितीसंस्कार साहित्यामार्पत झाले पाहिजे तर सक्षमीकरण संघटीत पयत्नांद्वारे झाले पाहिजे. यासाठी साहित्यिक आणि समाजातील विविध संस्था, व्यक्ती यांचा समन्वय आवश्यक आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महासभेच्या माध्यमातून साहित्यिक आणि समाज यांचा समन्वय योग्य पद्धतीने घडवनू संविधानाधिष्ठित राष्ट्र निर्माण करण्याचा आपण संकल्प करू या!
No comments:
Post a Comment